कधी मिळेल कोरोनाची लस ?

कधी मिळेल कोरोनाची लस ?

नवी दिल्ली/ वृत्तसंस्था - जगभरात धुमाकूळ घालणाऱ्या कोरोना विषाणुवर प्रतिबंध लावण्यासाठी सध्या जगभरात तीन कोरोना लसींच्या चाचण्या अंतिम टप्प्यात आल्या आहेत. या लसी आपापल्या देशांच्या नागरिकांना कशी मिळेल यासाठी प्रत्येक देश पुर्ण ताकतीने प्रयत्न करत आहे. त्यातच आपल्या भारतासाठी जमेची बाजू म्हणजे जगातील सर्वात मोठी लस बनविणारी कंपनी आपल्या देशातीलच आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांपर्यंत लस कशी पोहोचेल यासाठी केंद्र तसेच राज्य सरकारे कामाला लागली आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी सात राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून बैठक घेतली. या बैठकीला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा देखील उपस्थित होते. यामध्ये लसीच्या वितरणासंदर्भात चर्चा करण्यात आली. यावेळी मोदींनी लस कधी येईल हे आपल्या हाती नसल्याचे सांगितले. तसेच यामध्ये कोणत्याही प्रकारचे राजकारण करू नये असे आवाहनही केले. महाराष्ट्रासह अन्य काही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी कोरोना लस सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचवावी अशी मागणी केली आहे. 

एसएमएसद्वारे मिळेल लसीकरणाची माहिती 

 कोरोनाची लस जानेवारी किंवा फेब्रुवारीमध्ये येण्याची दाट शक्यता निर्माण झाली असून देशातील प्रत्येक नागरिकाला ही लस दिली जाणार आहे. यासाठी सरकारने काही टप्पे ठरविले असून, यानुसार सर्व प्रथम कोरोनाची लस आरोग्य कर्मचारी, कोरोना वॉरिअरना दिली जाणार आहे. यानंतर वरिष्ठ नागरिकांना दिली जाणार आहे. या यादीत ज्यांची नावे असतील त्यांना एसएमएसद्वारे लसीकरणाची तारीख, वेळ आणि ठिकाण कळविले जाणार आहे. याचबरोबर या मेसेजमध्ये लसीकरण करणारी संस्था, आरोग्य सेवकाचे नाव, इत्यादी माहिती असणार आहे. पहिला डोस दिल्य़ानंतर दुसरा डोस कधी मिळणार याचीदेखील माहिती एसएमएसद्वारे दिली जाईल. जेव्हा दोन्ही डोस दिले जातील तेव्हा एक डिजिटल QR आधारित सर्टिफिकेट दिले जाणार आहे. हा लसीकरण झाल्याचा पुरावा असणार आहे. या सर्व तयारीसाठी एक डिजिटल प्लॅटफॉर्म तयार केला जात असुन यामध्ये कोरोना लसीचा स्टॉक, वितरण, लसीकरण आदी ट्रॅक केले जाणार आहे.

तसेच कोरोना लस टोचली म्हणजे जबाबदारी संपले असे होणार नाही. लसीकरण झालेल्या नागरिकांवर सरकार बारकाईने लक्ष ठेवणार आहे. त्यामुळे लोकांमध्ये लसीबाबत असणारी भिती नष्ट होईल त्याबद्दल विश्वास वाढेल. लसीकरणाबाबत अनेक समाजांमध्ये अंधश्रद्धा असते, यामुळे लसीकराबाबत लोकांमध्ये जनजागृती करण्याचे काम राज्य सरकारांवर सोपविण्यात आले आहे. याचबरोबर लसीच्या दुष्परिणामांसाठी देखील सज्ज राहण्यास सांगण्यात आले आहे. सर्व राज्यामध्ये 'एडर्नालाइन इंजेक्‍शनचा' पुरेसा साठा करण्याची सूचना करण्यात आली आहे. कोरोना लसीची ॲलर्जिक रिॲक्शन दिसल्यास लोकांना हे इंजेक्शन दिले जाणार आहे.

पंतप्रधान मोदी २८ नोव्हेंबरला पुण्यात 

कोरोनावर नियंत्रण मिळविण्यासाठी पुण्यातील सिरम इन्स्टिट्युटकडुन 'कोविशिल्ड' लस तयार केली जात असुन, यातील पहिल्या व दुसऱ्या टप्प्यातील कोविशिल्ड लसीची चाचणी यशस्वीरीत्या पूर्ण झाली आहे. सध्या या लसीची तिसऱ्या टप्प्यातील चाचणी सुरू आहे. त्यामुळे सध्या सिरम इन्स्टिट्युटकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे. जानेवारी-फेब्रुवारीमध्ये सीरमच्या या लसीचे १० कोटी डोस बाजारात उपलब्ध होतील, असा दावा सिरम इन्स्टिट्युट ऑफ इंडियाचे सीईओ अदर पूनावाला यांनी केला आहे. त्यामुळे ही लस विकसित करण्याची प्रक्रिया कुठपर्यंत आली व कशी सुरु आहे ? याचा सविस्तर आढावा घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी २८ नोव्हेंबरला पुण्यात येण्याची शक्यता आहे. यादृष्टीने प्रशासकीय हालचाली सुरू झाल्या असून, पुण्याच्या विभागीय कार्यालयात एका बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. पुण्याचे विभागीय आयुक्त सौरभ राव यांना पंतप्रधान कार्यालयातून फोन देखील आला आहे. पंतप्रधान मोदींच्या या दौऱ्यात जवळपास १०० देशांचे राजदूत देखील सहभागी होणार असल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे.

आमच्या बातम्या WhatsApp वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा