राजधानी दिल्लीत कोरोनाचा कहर; स्मशानभूमीत अंत्यसंस्कारासाठी 'वेटींग'

राजधानी दिल्लीत कोरोनाचा कहर; स्मशानभूमीत अंत्यसंस्कारासाठी 'वेटींग'

नवी दिल्ली: राजधानी दिल्लीमध्ये कोरोनाचा कहर दिवसेंदिवस वाढत असुन, मागील १५ दिवसांत सुमारे १४०० लोक मरण पावले आहेत. दिल्लीच्या रूग्णालयात लोकांना बेड मिळवण्यासाठी अडचणींचा सामना करावा लागत आहे. तसेच स्मशानभूमीतही अंत्यसंस्कारासाठी प्रतिक्षा यादी लागली आहे.

 दिल्लीत कोरोनाची नवीन प्रकरणे आणि कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूची संख्या वाढत आहे. साथीच्या आजारावर उपचार करण्यासाठी सरकार उपाययोजना करीत असले, तरी कोविड १९ च्या वाढत्या प्रादुर्भावामुळे असे दिसते की बर्‍याच राज्यात ही परिस्थिती आणखी बिकट होऊ शकते. 

 देशात कोरोनाव्हायरसच्या रुग्णांची संख्या ९०.५० लाखांवर पोहोचली आहे, तर कोरोनायरस संसर्गातून बरे झालेल्या लोकांची संख्या ८४.७८ लाखांवर पोहोचली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने शनिवारी ही माहिती दिली. शनिवारी सकाळी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या २४ तासांत देशात कोरोनाव्हायरसचे ४६ हजार २३२ नवीन रुग्ण आढळले असुन, संसर्ग होण्याची एकूण संख्या ९० लाख ५० हजार ५९७ वर पोहोचली आहे. मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार कोरोना विषाणूने गेल्या २४ तासांत देशात ५६५ लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असुन, कोरोनाने आतापर्यंत एकुण १ लाख ३२ हजार ७२६ लोकांचा बळी घेतला आहे. 

देशातील बर्‍याच शहरांमध्ये कोरोनाची दुसरी 'वेव्ह'

कोरोनाव्हायरसच्या दुसऱ्या लाटेवर नियंत्रण ठेवण्यासाठी देशातील इतर राज्यातही प्रयत्न सुरू आहेत. अहमदाबादनंतर सूरत, वडोदरा आणि राजकोटमध्येही रात्रीची कर्फ्यू लागू करण्यात येणार आहे. दुसरीकडे, महाराष्ट्र सरकार दिल्ली-मुंबई हवाई आणि रेल्वे सेवा बंद करण्याचा विचार करीत आहे. तर कोरोनाव्हायरसची वाढती संख्या लक्षात घेता हरियाणामधील सर्व शाळा व महाविद्यालये ३० नोव्हेंबरपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय स्थानिक प्रशासनाने घेतला आहे. शिक्षकांना शाळेत जाण्यासही बंदी घातली आहे. मुंबईतही बीएमसीने ३१ डिसेंबरपर्यंत सर्व शाळा बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

आमच्या बातम्या WhatsApp वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा