"मुख्यमंत्री साहेब माझ्या बाबांनी दिवाळीला फटाके कपडे घेतले नाहीत..."

चिमुकलीचे थेट मुख्यमंत्र्यांना पत्र

"मुख्यमंत्री साहेब माझ्या बाबांनी दिवाळीला फटाके कपडे घेतले नाहीत..."

सेनगाव (जि. हिंगोली) - यावर्षी झालेल्या अतिवृष्टी व पुरामुळे शेती, पिकांचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. यासाठी शेतकरी बांधवांनी ओला दुष्काळ जाहीर करण्यासाठी व नुकसान भरपाईसाठी ठीक ठिकाणी आंदोलनही केले. यासंदर्भात नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी २२ ऑक्टोबर रोजी शासनाकडे अहवाल पाठविण्यात आला होता, पण हवी तशी नुकसान भरपाई शेतकऱ्यांना मिळाली नाही. यामुळे शेतकऱ्यावर काय बित त असेल हे शेतकरीच सांगू शकतात. 

हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यातील ताकतोडा या छोट्याशा गावात राहणाऱ्या अशाच एका शेतकऱ्याच्या सातवीत शिकणाऱ्या कन्येने थेट राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरें यांना पत्र लिहून आपली व आपल्या कुटुंबाची व्यथा मांडली. यामध्ये तिने लिहिले की, "माझ्या बाबांनी या दिवाळीत फटाके व कपडे घेतले नाहीत. यावर्षी आमच्या गावा शेजारच्या शेतात खूप पाऊस पडला माझ्या बाबांनी सांगितले की अतिपावसामुळे सोयाबीन आपल्याला कमी झाली. आपल्याकडे पैसे नाहीत यावर्षी आपलं कर्ज ही माफ झाले नाही. पुन्हा उडीद ही खराब झाली. मी बाबांना म्हटलं की दिवाळीत घरीच राहा पण ते म्हणाले की शेतात दिवसभर लाईट नसल्याने रात्रीत शेतात पाणी द्यायला जावं लागतं. त्यामुळे बाबाही घरी राहत नाहीत मी आणि माझा भाऊ बाबांना म्हटलं की कपडे आणि फटाके घ्या पण ते म्हणतात की नुकसानीचे पैसे बँकेत आल्यावर घेऊ त्यामुळे, आम्ही दिवाळी साजरी केली नाही कपडे फटाके घेतले नाहीत." आईकडे तक्रार केली की आई-बाबांचे भांडण होतात यामुळे तुम्ही नुकसानीचे पैसे लवकर बँकेत टाका. अशी विनंती तिने मुख्यमंत्र्यांना आपल्या पत्रातून केली आहे.  

 दरम्यान कृषी व महसूल विभागाने संयुक्त सर्वेक्षण करून जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि जिल्हा कृषी अधीक्षक व कृषी अधिकाऱ्यांच्या स्वाक्षरीने कृषी आयुक्तांकडे पाठवलेल्या अहवालात हिंगोली जिल्ह्यातील नुकसानग्रस्त ३ लाख ७ हजार ८३० शेतकऱ्यांना १५४ कोटी ७१ लाख ७३ हजार ५१८ रुपयांची गरज असल्याचे नमूद केले आहे.

दिवाळीपर्यंत नुकसान भरपाई देण्याचा होता सरकारचा दावा 

सध्या लागु असलेल्या पदवीधर निवडणूक आचारसंहितेमुळे शेतकऱ्यांना मदत देण्यात अडथळा येऊ नये यासाठी राज्य शासनाने निवडणूक अधिकाऱ्यांना पत्र पाठविले होते. निवडणूक अधिकाऱ्यांकडून परवानगी मिळाल्यानंतर दिवाळीपूर्वी अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना भरपाईचे पैसे मिळण्यास सुरुवात होईल असे राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी सांगितले होते. मात्र अद्यापही दिवाळी झाल्यावर देखील अनेक ठिकाणी नुकसान भरपाई भरपाईची रक्कम मिळाली नसल्याचे दिसून येत आहे.

आमच्या बातम्या WhatsApp वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा