मराठवाड्यातील आणखी एका जिल्ह्यात आज मध्यरात्रीपासून लॉकडाऊन

प्रशासन आपल्या जबाबदारीपासून पळ काढत असल्याची नागरिकांची भावना

मराठवाड्यातील आणखी एका जिल्ह्यात आज मध्यरात्रीपासून लॉकडाऊन

परभणी/ प्रतिनिधी - कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादूर्भावाच्या पार्श्वभूमीवर परभणीचे जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी आज शुक्रवार मध्यरात्रीपासून महानगर पालिका हद्द व पाच किलोमीटरचा परिसर तसेच सर्व नगर पालिका क्षेत्रात सोमवारी दि. १५ मार्च सकाळी सहा वाजेपर्यंत संचारबंदी लागू केली आहे.

मुंबई निवासी असलेले जिल्ह्याचे पालकमंत्री नवाब मलीक यांनी मुंबईतून इलेक्ट्रॉनिक्स माध्यमांना दिलेल्या माहितीतून परभणी जिल्ह्यात लॉकडाऊन केले जाईल. जिल्हाधिकार्‍यांशी याबाबत बोललो आहोत, असेही नमूद केले. त्यामुळे संपूर्ण जिल्ह्याचे जिल्हाधिकार्‍यांच्या अधिकृत आदेशाकडे लागले होते.

जिल्हाधिकारी मुगळीकर यांनी दुपारी तीन वाजेच्या सुमारास काढलेल्या आदेशात या संचारबंदीच्या नागरिकांनी घराबाहेर पडू नये, अशा सूचना दिल्या आहेत. या काळात औषधी, किराणा, दूध या जीवनावश्यक वस्तु अपवाद. अन्य संपूर्ण व्यवहार व बाजारपेठा पूर्णतः बंद राहतील, असे म्हटले आहे. 

संचारबंदीतुन यांना असेल सुट 

 संचारबंदीच्या काळात अत्यावश्यक सर्व शासकीय व खासगी दवाखाने, औषधी दुकाने, लसीकरण केंद्र, चाचणी केंद्र, आपत्कालीन व्यवस्था, शासकीय वाहने, अत्यावश्यक सेवेसाठी परवाना घेतलेले वाहने, माध्यमांचे प्रतिनिधी, पेट्रोलपंप व गँस वितरकांना सूट राहणार आहे. दूध विक्रेत्यांना सकाळी सहा ते नऊ या वेळेत दूध देता येणार असून एकाच ठिकाणी थांबुन दूध विक्री करता येणार नाही. या शिवाय कोरोना लसीकरण केलेल्या व्यक्ती, लसीकरणासाठी जाणार्‍या व्यक्तींना सूट देण्यात आली आहे. आरटीपीसीआर, अँटीजन चाचणी करण्यासाठी जाणार्‍या व्यक्तींना, परीक्षेसाठी जाणारे विद्यार्थी तसेच महाविद्यालयाचे शिक्षक व कर्मचारी, परीक्षेसाठी येणार्‍या विद्यार्थ्यांसाठी एसटी महामंडळाच्या बसेसला सूट राहणार आहे, असे जिल्हाधिकारी मुगळीकर यांनी काढलेल्या या आदेशात म्हटले. 

दोन आकडी रुग्ण संख्या तरी देखील लॉकडाऊन 

परभणी जिल्ह्यात मागील सात दिवसांमध्ये एकाही दिवशी ८५ च्यावर कोरोना रुग्ण संख्या गेली नाही. तरी देखील पालकमंत्री आणि जिल्हाधिकाऱ्यांनी लॉकडाऊनचे हत्यार उपसल्याने जिल्ह्यातील व्यापारी व नागरिकांकडून आश्चर्य व्यक्त केली जात आहे. मागील एका वर्षापासून सुरू असलेल्या लॉकडाऊनला आता नागरिक कंटाळले असुन प्रशासन असे पुर्णतः लॉकडाऊन लावुन आपल्या जबाबदारीपासून पळ काढत आहे का ? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. 

मागील सात दिवसांमध्ये मिळालेले कोरोना बाधीत 

५ मार्च - ४७

६ मार्च - ८४

७ मार्च - २०

८ मार्च - १९

९ मार्च - ५९

१० मार्च - ७९

११ मार्च - ८९

आमच्या बातम्या WhatsApp वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा