गंगाखेडनजीक ट्रक- ऑटोचा भीषण अपघात; चार जणांचा जागीच मृत्यू

लग्न सोहळा उरकून गावी परत येताना तरुणांवर काळाचा घाला 

गंगाखेडनजीक ट्रक- ऑटोचा भीषण अपघात; चार जणांचा जागीच मृत्यू

 गंगाखेड/ प्रतिनिधी - गंगाखेड परळी रस्त्यावर गंगाखेड शहरापासून पंधरा किलोमीटर अंतरावर ऑटो व ट्रकच्या समोरासमोर झालेल्या थडकेत आँटोतील चार व्यक्ती जागीच ठार झाल्याची घटना आज रविवार दि. १३ डिसेंबर रोजी सायंकाळी सातच्या सुमारास घडली.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, सोनपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील करम पाटीजवळ रविवारी संध्याकाळी सातच्या सुमारास एक ऑटो चार जणांना घेऊन गंगाखेड - परळी रस्त्याने परळीकडे जात होता. ते सर्वजण सोनपेठ तालुक्यातील चुकार पिंपरी येथे विवाह सोहळ्यासाठी आले होते. तेथून ते सर्व जण अंबेजोगाईकडे ऑटोने परत जात होते. करम पाटीजवळ ऑटो (एम एच २३ टीआर ३११) ला समोरुन राख घेऊन येणाऱ्या हायवा ट्रक (एम एच २२ ए एन ५१२१) ने जोरदार धडक दिली. समोरासमोर झालेल्या धडकेत आटो रस्त्याखाली गेल्याने या अपघातात ऑटोचा चुराडा होऊन ऑटोतील विशाल बागवाले (२०), दत्ता सोळंके (२५), आकाश चौधरी (२३), ऑटो चालक मुकुंद म्हस्के (२२) सर्व रा. अंबेजोगाई हे चार जण जागीच ठार झाले. अपघात घडतात तेथील नागरिकांनी ऑटोतील सर्वाना तातडीने गंगाखेडच्या शासकीय उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र तत्पुवीच त्यांचा मृत्यु झाला. 

हे ही वाचा क्लासरुममध्येच अल्पवयीन प्रेमीयुगुलांचे'शुभमंगल सावधान'

या घटनेची माहिती मिळताच सोनपेठ पोलीस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक श्रीनिवास भिकाने, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक देवराव मुंढे, पांडुरंग काळे, गणेश नाटकर, गोपाळ खंदारे, गंगाखेड पोलिस ठाण्याच्या पोलिस निरीक्षक वसुंधरा बोरगांवकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेश राठोड यांच्यासह पोलिस कर्मचारी घटनास्थळी धाव‌ घेऊन मयतांचे मृतदेह चुराडा झालेल्या ऑटोतुन बाहेर काढले.

आमच्या बातम्या WhatsApp वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा