शिक्षक मतदारांनी आपल्या न्याय हक्कासाठी प्रा. किरण पाटील यांनाच बहुमताने विजयी करावे-आ. रमेशआप्पा कराड

शिक्षक मतदारांनी आपल्या न्याय हक्कासाठी प्रा. किरण पाटील यांनाच बहुमताने विजयी करावे-आ. रमेशआप्पा कराड

लातूर / प्रतिनिधी -  केंद्र आणि राज्य शासन शिक्षण क्षेत्राला प्राधान्य देणारे आहे. राज्यातील शिंदे- फडणवीस सरकारने कोट्यावधी रुपयांची तरतूद करून सर्व शाळा अनुदानित केल्या असून शिक्षक मतदारांनी आपल्या न्याय हक्कासाठी भाजपा व मित्र पक्षाचे उमेदवार प्रा. किरण पाटील यांनाच पहिल्या पसंतीचे अमुल्‍य मत देऊन बहुमताने विजयी करावे असे आवाहन भाजपाचे जिल्हाध्यक्ष आ. रमेशआप्पा कराड यांनी लातूर येथील शिक्षक मेळाव्‍यात बोलताना केले.
        औरंगाबाद विभाग शिक्षक मतदार संघातील भाजपा, बाळासाहेबांची शिवसेना, रिपाई (आ), शिवसंग्राम, रयत क्रांती संघटना आणि शिक्षक परिषदेचे अधिकृत उमेदवार प्रा. किरण पाटील यांच्या प्रचारार्थ लातूर येथे सोमवारी सायंकाळी शिक्षक मतदारांचा भाजपाचे जिल्हाध्यक्ष आ. रमेशआप्पा कराड यांच्या अध्यक्षतेखाली मेळावा झाला. त्यावेळी ते बोलत होते. या मेळाव्यास खा. सुधाकर शृंगारे, उमेदवार प्रा. किरण पाटील, भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष विनायकराव पाटील, अनुसूचित जाती मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष सुधाकर भालेराव, प्रदेश सचिव अरविंद पाटील निलंगेकर, माजी आमदार गोविंदअण्णा केंद्रे, प्रदेश प्रवक्ते गणेशदादा हाके, प्रदेश भाजपाचे शैलेश लाहोटी, शहर जिल्हाध्यक्ष गुरुनाथ मग्गे, महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे मराठवाडा अध्यक्ष नंदकुमार झरीकर, जिल्हाध्यक्ष शिवकुमार मुर्गे, शहराध्यक्ष राजाभाऊ खंदाडे, भाजपाचे जिल्हा सरचिटणीस संजय दोरवे, विक्रमकाका शिंदे, अमोल पाटील, संतोष मुक्ता, मीनाताई भोसले, दिग्विजय काथवटे, प्रवीण सावंत, शिरीष कुलकर्णी, सिद्धेश्वर मामडगे, ज्ञानेश्वर चेवले यांच्यासह अनेकांची व्यासपीठावर उपस्थिती होती.


          गेल्या पंधरा वर्षात शिक्षक आमदाराने कधीच शिक्षकासंबंधीचे प्रश्न सभागृहात पोटतिडकीने मांडले नाहीत. महाविकास आघाडीच्या नेत्यासह आमदारांनी सत्‍तेच्‍या काळात भ्रष्टाचार आणि वसुलीचेच काम केले. उद्धव ठाकरेची सेना भुरटे चोर आहेत तर राष्ट्रवादी काँग्रेसवाले दरोडेखोर आहेत असा आरोप करून आ. रमेशआप्पा कराड म्हणाले की, शिक्षण सेवक या पदाच्या माध्यमातून शिक्षकांच्या पदवीचा अपमान होतोय तेव्हा सेवक हा शब्द काढून त्यांचा मान सन्मान वाढीला पाहिजे. त्यांना योग्य तो मोबदला मिळाला पाहिजे. वर्षानुवर्ष धुळ खात पडलेले अनेक प्रश्न सोडविण्याचे काम केंद्र आणि राज्य शासन करत आहे. शिक्षकांच्या प्रश्नांची सोडवणूक होण्यासाठी, न्याय हक्क मिळण्यासाठी, कर्तुत्वान आणि प्रश्नांची जाण असणारे प्रा. किरण पाटील यांनाच आपले अमुल्य मत देवून विजयी करावे असे आवाहन आ. कराड यांनी केले.
          यावेळी बोलताना उमेदवार प्रा. किरण पाटील म्हणाले की, शिक्षक मतदारांचे कोणते प्रश्न, किती सुटले, किती राहिले याचा गेल्या पंधरा वर्षात कधीच विचार झाला नाही. मात्र राज्‍याचे शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्यासोबत झालेल्या बैठकीत शिक्षण क्षेत्रातील त्रुटीची पूर्तता, टप्पा वाढ, अघोषित शाळेचा प्रश्न, २० टक्के याबाबत सविस्तर चर्चा होऊन एकनाथजी शिंदे आणि देवेंद्रजी फडणवीस यांच्या सरकारने कॅबिनेटच्या बैठकीत ११६० कोटी रुपयांची राज्याच्या इतिहासात नोंद होण्यासारखी गेल्‍या महिन्‍यात तरतूद केली. त्यामुळे राज्यात एकही शाळा विनाअनुदानित राहिली नाही. याबाबतचा आचार संहितेत अडकलेला अध्यादेश लवकरच निघेल आणि त्याचबरोबर शिक्षकांच्या जुन्या पेन्शन प्रश्नाबाबत सकारात्मक चर्चा झाल्‍याने लवकरच निर्णय होणार असल्याची माहिती दिली.
          याप्रसंगी खासदार सुधाकर शृंगारे यांनी केंद्र शासनाने केलेल्या कामाची माहिती दिली. अरविंद पाटील निलंगेकर यांनी या निवडणुकीत बदल अटळ असल्याचे बोलून दाखवले. तर विनायकराव पाटील यांनी राष्ट्रवादीच्या उमेदवाराने मत मागण्याची पत कुठेही ठेवली नाही असे बोलून दाखवले. सुधाकर भालेराव, शैलेश लाहोटी, गणेशदादा हाके, गोविंदअण्णा केंद्रे आणि शिक्षक परिषदेचे नंदकुमार झरीकर यांनी केंद्रात आणि राज्यात भाजपाचे सरकार असल्याने शिक्षकांच्या सर्व प्रश्नांची सोडवणूक येत्या काळात झाल्याशिवाय राहणार नाही असे सांगून शिक्षकांनी आपल्या हितासाठी किरण पाटील यांनाच विजयी करावे असे आवाहन केले.
         प्रारंभी शहर जिल्हाध्यक्ष गुरुनाथ मग्गे यांनी आपल्या प्रास्ताविक भाषणातून लातूर शहर आणि जिल्ह्यातील प्रचार यंत्रणेची माहिती दिली. या मेळाव्याचे सूत्रसंचालन जिल्हा सरचिटणीस संजय दोरवे यांनी केले तर शेवटी जिल्हा प्रसिद्धी प्रमुख चंद्रकांत कातळे यांनी आभार मानले. या मेळाव्यास लातूर शहरासह ग्रामीण भागातील शिक्षक बांधव मतदार भाजपाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आमच्या बातम्या WhatsApp वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा