बीड जिल्हा अनिश्चित काळासाठी 'अंशत: लॉकडाऊन'

बीड जिल्हा अनिश्चित काळासाठी 'अंशत: लॉकडाऊन'

बीड/ प्रतिनिधी - प्रशासन देत असलेल्या आकडेवारीनुसार राज्यात कोरोनाचा विळखा दिवसेंदिवस घट्ट होत आहे. त्यासोबतच बीड जिल्ह्यात देखील कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव मागील काही दिवसांत अतिशय वेगाने वाढत आहे. यामुळे इतर जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांप्रमाणे बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांनी देखील लॉकडाऊनचे हत्यार उपसले आहे. कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव नियंत्रणात आणण्यासाठी व प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्ह्यात शनिवारी सायंकाळी सात नंतर सकाळी सात पर्यंत दुकानांसह बार, हॉटेल, रेस्टाॅरंट, बार, खानावळ पूर्णतः बंद तसेच गुरुवारपासून मंगल कार्यालये, इतर कार्यक्रम अनिश्चित काळासाठी बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांनी दिले आहेत. तसेच कोरोना आटोक्यात येईपर्यंत नागरिकांना नियमांचे पालन करने अनिवार्य करण्यात आले आहे.

बीडचे जिल्हाधिकारी जगताप यांनी काढलेल्या आदेशात म्हंटले आहे की, बीड जिल्ह्यातील सर्व हॉटेल, खानावळ, चहाचे हॉटेल, बार, रेस्टॉरंट, पानटपरी इ. ग्राहकांसाठी पूर्णतः बंद राहतील. यासोबतच जिल्ह्यातील सर्व मंगल कार्यालये, फंक्शन हॉल व इतर कार्यक्रम १८ मार्च २०२१ रोजीच्या नंतर अनिश्चित काळासाठी बंद राहतील. जिल्ह्यातील फळ विक्रेते व भाजीपाला विक्रेते यांनी मास्कचा वापर करून फळ व भाजीपाला विक्री करावा. जो फळ-भाजीपाला विक्रेता विनामास्क विक्री केल्याचे निदर्शनास येईल अशा विक्रेत्यांवर कारवाई करण्याचे निर्देश दिलेले आहेत. सर्व दुकानदार, आस्थापनाधारक यांनी व त्यांचे कामगार, कर्मचारी यांची दर पंधरा दिवसांनी त्यांची कोविड विषाणू चाचणी करून त्याचा अहवाल जवळ बाळगणे बंधनकारक राहील. सर्व हॉटेल, खानावळ, चहाचे हॉटेल, बार, रेस्टॉरंट, पानटपरी येथून पार्सल सुविधा सुरू राहील. सर्व नागरिकांनी कोविड -१९ बाबतचे मार्गदर्शक तत्वे सक्तीने पाळावीत व मास्क, सॅनिटाझर, स्वच्छता, सोशल डिस्टन्सिंग इ. चे पालन करणे बंधनकारक राहील. बीड जिल्ह्यामध्ये शनिवारपासून सायंकाळी ७ वाजता सर्व दुकानेे बंद ठेवण्यात आली होती.

आमच्या बातम्या WhatsApp वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा