रोमहर्षक सामन्यात ठरला पंजाबच 'किंग'

राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसन ची शतकी खेळी व्यर्थ

रोमहर्षक सामन्यात ठरला पंजाबच 'किंग'

मुंबई/ वृत्तसंस्था - कर्णधार लोकेश राहुल, दिपक हुड्डा, युनिव्हर्स बॉस ख्रीस गेल यांनी केलेल्या फटकेबाजी मुळे आज आयपीएलच्या चौथ्या सामन्यात पंजाब किंग्सने २२१ धावांचा डोंगर उभारला. प्रत्युत्तरात पंजाब किंग्सच्या २२१ धावांचा पाठलाग करताना राजस्थान रॉयल्सला साजेशी सुरुवात करता आली नाही. पण, प्रथमच कर्णधाराच्या भूमिकेत असलेल्या संजू सॅमसननं तुफान खेळ करताना PKBS च्या मनातील धाकधुक कायम राखली. जोस बटलर व शिवम दुबे यांच्यासोबत संजूनं RR च्या डावाला आकार दिला. रियान परागसह त्यानं १९ चेंडूंत अर्धशतकी भागीदारी केली. संजू सॅमसननं आयपीएलमधील तिसरे शतक पूर्ण केले. त्यानं ५४ चेंडूंत १२ चौकार व ५ षटकारांसह हे शतक पूर्ण केलं. कर्णधार म्हणून पहिल्याच सामन्यात शतक करणारा तो पहिलाच खेळाडू ठरला. राजस्थानला ७ बाद २१७ धावांवर समाधान मानावे लागले.

बेन स्टोक्सचा भोपळा अन् संजू सॅमसननं डाव सावरला 

२२२ धावांच्या तगड्या लक्ष्याचा पाठलाग करताना राजस्थान रॉयल्सला अपेक्षित सुरुवात करता आली नाही. मोहम्मद शमीनं टाकलेल्या पहिल्याच षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर बेन स्टोक्स याने मारलेला फटका जागच्या जागी उंच उडाला. तो चेंडू झेलण्यासाठी यष्टिरक्षक लोकेश राहुल, शमी आणि आणखी एक खेळाडू धावला. झेल तू घेतोस की मी, अशीच परिस्थिती निर्माण झाली होती. परंतु, शमीनं तो टिपला अन् स्टोक्सन शून्यावर माघारी परतला. कर्णधार संजू सॅमसन डाव सावरण्यासाठी प्रयत्न करताना दिसला. जोस बटलरसह त्यानं ४५ धावा जोडल्या. राजस्थाननं पहिल्या १० षटकांत ३ बाद ९५ धावा केल्या. संजूनं ३३ चेंडूंत अर्धशतक पूर्ण केलं. शिवम दुबेची त्याला साथ मिळाली आणि चौथ्या विकेटसाठी दोघांनी अर्धशतकी भागीदारी केली. पण, अर्षदीप सिंगनं ही जोडी तोडली, दुबे २३ धावांवर माघारी परतला.

२४ चेंडूंत ४८ धावा अन् शमीनं सामन्यात आणली चुरस

संजू सॅमसन व रियान पराग यांनी पाचव्या विकेटसाठी २३ चेंडूंत ५२ धावांची भागीदारी करून पंजाबचं टेंशन वाढवलं होतं. RR ला विजयासाठी अखेरच्या चार षटकांत ४८ धावांची गरज असताना लोकेश राहुलनं संघातील अनुभवी गोलंदाज मोहम्मद शमीला पाचारण केलं. त्यानं तिसऱ्या चेंडूवर ही जोडी तोडली. पराग ११ चेंडूंत १ चौकार व ३ षटकारांसह २५ धावा केल्या. संजू सॅमसनचा संघर्ष अखेरपर्यंत दिसला. अखेरच्या ६ चेंडूंत १३ धावांची गरज होती अन् पहिल्या दोन चेंडूवर एकच धाव मिळाली. तिसऱ्या चेंडूवरही एकच धाव आली आणि तीन चेंडूंत ११ धावा अशी परिस्थिती निर्माण झाली. संजूनं खणखणीत षटकार खेचून सामन्यातील चुरस कायम राखली. पाचव्या चेंडूवर संजूनं एक धाव न घेतल्यानं १ चेंडू ५ धावांची RR ला गरज होती. संजूची अखेरच्या चेंडूवर विकेट पडली अन् पंजाबनं ४ धावांनी सामना जिंकला.

१३ षटकार अन् १८ चौकारांची आतषबाजी

 प्रथम फलंदाजी करताना पंजाबच्या दीपक हुडा, लोकेश राहुल आणि ख्रिस गेल या त्रिकुटानं राजस्थान रॉयल्सच्या गोलंदाजांच्या चिंधड्या उडवल्या. दीपक हुडा व लोकेश राहुल या जोडीनं ४७ चेंडूंत १०५ धावांची भागीदारी करताना पंजाब किंग्सला दोनशेपार धावा करून दिल्या. लोकेश राहुल ५० चेंडूंत ७ चौकार व ५ षटकारांसह ९१ धावांवर माघारी परतला. RR च्या चेतन सकारियानं ३१ धावांत ३ विकेट्स अन् एक अफलातून झेल घेत आपली छाप सोडली. लोकेश राहुलला दोन जीवदान मिळाले आणि त्याचाच फटका RR ला बसला. 

ख्रिस गेलचा ३५० वा षटकार 

४१ वर्षीय ख्रिस गेलनं आजच्या सामन्यात ३५०वा षटकार खेचून आयपीएलमध्ये मोठा विक्रम नावावर केला. २८ चेंडूंत ४ चौकार व २ षटकारांसह ४० धावा करणाऱ्या गेलचा झेल बेन स्टोक्सनं टिपला. दीपक हुडानं २८ चेंडूंत ६४ धावा कुटल्या. त्यापैकी ५२ धावा या केवळ चौकार व षटकारानं आल्या ( ४ चौकार व ६ षटकार). पंजाब किंग्सनं २० षटकांत ६ बाद २२१ धावांचा डोंगर उभा केला.

आमच्या बातम्या WhatsApp वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा