आजपासून 'इंडिया का त्यौहार'; बलाढ्य 'मुंबई' समोर बंगलोरचे 'विराट' आव्हान

आयपीएलच्या १४ व्या हंगामास आजपासून सुरुवात

आजपासून 'इंडिया का त्यौहार'; बलाढ्य 'मुंबई' समोर बंगलोरचे 'विराट' आव्हान

चैन्नई/ वृत्तसंस्था - सध्या देशात सरकारच्या आकडेवारीनुसार कोरोना धुमाकूळ घालत आहे. याच कोरोनाच्या सावटाखाली आता आजपासून आयपीएलचे १४ व्या हंगामाला सुरुवात होत आहे. यामुळे क्रिकेटप्रेमींचे आता पुढचे दोन महिने मनोरंजन होणार आहे. जगातील सर्वात लोकप्रिय असलेल्या इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) चे १४ वे पर्व आजपासून सुरु होणार आहे. या हंगामाच्या पहिल्या सामन्यात आयपीएल वर सर्वाधिक वेळा अधिराज्य गाजविलेला गतविजेते मुंबई इंडियन्स आणि मातब्बर आणि धडाकेबाज खेळाडूंचा समावेश असलेल्या रॉयल चॅलेंजर्स बंगलोर हे दोन्ही संघ चैन्नईतील एम.ए. चिदंबरम स्टेडियमवर भिडणार आहेत. या दोन्ही बलाढ्य संघांदरम्यान काटे का मुकाबला क्रिकेटप्रेमींना पाहायला मिळणार हे मात्र नक्की. 

सध्या मात्र दोन्ही संघांसमोर पहिल्या सामन्यासाठी काही अडचणी देखील आहेत. बंगलोर संघाचा सलामीवीर देवदत्त पडीक्कल आणि अष्टपैलू डॅनियल सॅम यांना कोरोनाची लागण झाली आहे. यातच देवदत्त पुन्हा मैदानात परतला असून डॅनियल सॅम अजुनही विलगीकरणात आहे. फिरकीपटू ॲडम झम्पा देखील पहिल्या सामन्याला मुकणार आहे. 

दुसरीकडे मुंबई इंडियन्स संघात क्वारंटाईनच्या नियमानुसार दक्षिण आफ्रिकेतून भारतात दाखल झालेला क्विंटन डी कॉक पहिला सामना खेळण्याची शक्यता धुसर आहे. असे असले तरी मुंबई कडे अनेक पर्यायी खेळाडू तयार आहेत. तसेच मुंबई संघ आयपीएल स्पर्धेच्या इतिहासातील सर्वात यशस्वी संघ आहे हे विसरून चालणार नाही. त्यामुळे आकडेवारी पाहता पहिल्या सामन्यात मुंबईचे पारडे जड वाटत आहे. 

सामना - मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगलोर 

ठिकाण - एम ए चिदंबरम स्टेडियम, चैन्नई 

वेळ - सायंकाळी ७ वाजून ३० मिनिटांनी 

थेट प्रक्षेपण - स्टार स्पोर्ट्स नेटवर्क, हॉटस्टार 

संभाव्य संघ - 

मुंबई इंडियन्स - रोहित शर्मा (कर्णधार), क्रिस लीन, सुर्यकुमार यादव, ईशान किशन (यष्टिरक्षक), कायरन पोलार्ड, हार्दिक पंड्या, कृणाल पंड्या, नाथन कुल्टर नाईल, पियुष चावला/ राहूल चहर, ट्रेंट बोल्ट, जसप्रीत बुमराह 

रॉयल चॅलेंजर्स बंगलोर - देवदत्त पडीक्कल, विराट कोहली (कर्णधार), एबी डिविलिर्यस (यष्टिरक्षक), ग्लेन मॅक्सवेल, रजत पाटीदार/ मोहम्मद अझरुद्दीन, सचीन बेबी, डॅनियल क्रिस्टीयन, वॉशिंग्टन सुंदर, मोहम्मद सिराज, यजुवेंद्र चहल, काईले जेमिंसन/ केन रिचर्डसन

आमच्या बातम्या WhatsApp वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा