गब्बर धवनची विक्रमी खेळी; दिल्लीकडून चैन्नईचा 'सुपर' पराभव

गब्बर धवनची विक्रमी खेळी; दिल्लीकडून चैन्नईचा 'सुपर' पराभव

मुंबई/ वृत्तसंस्था - दिल्लीचे सलामीवीर पृथ्वी शॉ आणि शिखर धवन यांनी चेन्नई सुपर किंग्सच्या गोलंदाजांची सहजतेनं धुलाई केली. १८८ धावांचा पाठलाग करताना या दोघांनी पहिल्या विकेटसाठी १३८ धावांची भागीदारी करताना दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाचा मजबूत पाया रचला. CSK च्या खेळाडूंनी पृथ्वीला दिलेले दोन जीवदान महागात पडले. पराभव समोर दिसताना CSK च्या खेळाडूंकडून विजयासाठीचा संघर्षही दिसला नाही. रिषभ पंत व मार्कस स्टॉयनिसनं DC चा विजय पक्का केला. दिल्लीनं ७ विकेट्स राखून हा सामना जिंकला

पृथ्वी शॉ-शिखर धवन यांनी रचला विजयाचा भक्कम पाया

घरच्या मैदानावर खेळणाऱ्या पृथ्वी शॉनं कोणतीच घाई न करता चेंडूला केवळ दिशा देण्याचं काम केलं. विजय हजारे ट्रॉफीतील फॉर्म कायम राखताना त्यानं चेन्नईच्या गोलंदाजांनाही हतबल केलं. पृथ्वीला जीवदान देण्याची चूक CSK ला महागात पडली. दोन्ही खेळाडू अगदी सहजतेनं CSK च्या गोलंदाजांचा समाचार घेत होते, कोणताच आक्रमकपणा त्यांच्या फटक्यात नव्हता, होतं फक्त टायमिंग. पृथ्वी शॉ ३८ चेंडूंत ७२ धावांवर माघारी परतला आणि त्यात ९ चौकार व ३ षटकारांचा समावेश होता. शिखर धवनही ५४ चेंडूंत १० चौकार व २ षटकारांसह ८५ धावांवर माघारी परतला. आयपीएलमध्ये ६०० चौकार मारणारा तो पहिला फलंदाज ठरला. 

सुरेश रैनाची खेळी व्यर्थ

सुरेश रैनाने दिल्ली कॅपिटल्सच्या गोलंदाजांची वाट लावली. CSK चे दोन्ही सलामीवीर माघारी परतल्यानंतर सुरेश रैनानं तिसऱ्या व चौथ्या विकेटसाठी अनुक्रमे मोईन अली व अंबाती रायुडू यांच्यासह अर्धशतकी भागीदारी करताना CSK चा डाव सावरला. सुरेश रैना व मोईन अली या दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी ३८ चेंडूंत ५३ धावांची भागीदारी करून चेन्नईची गाडी रुळावर आणली. अली २४ चेंडूंत ४ चौकार व २ षटकार खेचून ३६ धावांवर माघारी परतला अंबाती रायुडू १६ चेंडूंत १ चौकार व २ षटकारांसह २३ धावांवर माघारी परतला. १६व्या षटकात रैना रन आऊट झाला. त्यानं ३६ चेंडूंत ३ चौकार व ४ षटकारासह ५४ धावा केल्या. महेंद्रसिंग धोनी शून्यावर बाद झाला. रवींद्र जडेजा व सॅम कुरन यांनी अखेरच्या षटकांत तुफान फटकेबाजी करताना चेन्नईला मोठी मजल मारू दिली. या दोघांनी अर्धशतकी भागीदारी करताना चेन्नईला २० षटकांत ७ बाद १८८ धावा करून दिल्या. सॅम १५ चेंडूंत ४ चौकार व २ षटकारांसह ३४ धावा चोपून माघारी परतला. जडेजा १७ चेंडूंत ३ चौकारांसह २६ धावांवर नाबाद राहिला.

चेन्नई सुपर किंग्सविरुद्ध सर्वाधिक धावा

शिखर धवन - ९०२*

विराट कोहली - ९०१

रोहित शर्मा - ७४९

डेव्हिड वॉर्नर - ६१७

एबी डिव्हिलियर्स - ५९३

रॉबीन उथप्पा - ५९०

दिल्ली कॅपिटल्ससाठी पहिल्या विकेटसाठी सर्वोत्तम भागीदारी

माहेला जयवर्धने/वीरेंद्र सेहवाग - १५१ वि. मुंबई इंडियन्स, २०१३

डेव्हिड वॉर्नर/वीरेंद्र सेहवाग - १४६ वि. पंजाब किंग्स, २०११

पृथ्वी शॉ/ शिखर धवन - १३८ वि. चेन्नई सुपर किंग्स, २०२१

आमच्या बातम्या WhatsApp वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा