गुरू - शिष्य लढतीवर नजर; दिल्ली समोर चैन्नईचे 'सुपर' आव्हान

गुरू - शिष्य लढतीवर नजर; दिल्ली समोर चैन्नईचे 'सुपर' आव्हान

मुंबई/ वृत्तसंस्था - आयपीएलच्या यंदाच्या मोसमाला रोमहर्षक सामन्याने सुरुवात झाली आहे. मुंबई विरुद्ध बंगळुरूचा पहिलाच सामना शेवटच्या चेंडूपर्यंत रंगला होता. त्यामुळे सुरुवातच इतकी दमदार झाली की आता क्रिकेट चाहत्यांची उस्तुकता ताणली गेली आहे. प्रत्येक संघात यावेळी काहीतरी नवे बदल आणि नव्या दमाचे खेळाडू पाहायला मिळणार आहेत. त्यात आजच्या दिल्ली विरुद्ध चेन्नईचा सामन्याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे.

श्रेयस अय्यर दुखापतीमुळे बाहेर गेल्यानं दिल्ली कॅपिटल्सची धुरा युवा यष्टीरक्षक रिषभ पंतकडे देण्यात आलीय. तर दुसरीकडे गेल्या मोसमात निराशाजनक कामगिरी केलेला महेंद्रसिंग धोनीचा चेन्नई सुपरकिंग्ज संघ यंदा नव्या दमासह मैदानावर उतरणार आहे. त्यात धोनीच्या कामगिरीकडे सर्वांचं लक्ष असणार आहे.

दिल्लीसमोर मोठी समस्या

दिल्ली कॅपिटल्सचा नवनिर्वाचित कर्णधार रिषभ पंत सध्या तुफान फॉर्मात असला तरी कर्णधार म्हणून संघाला कसे पुढे घेऊन जाऊ शकतो याची परीक्षा असणार आहे. त्यात दिल्लीचं वेगवान अस्त्र कगिसो रबाडा, ॲन्रिच नॉर्जे पहिल्या सामन्याला मुकणार आहेत. पाकिस्तान विरुद्धची मालिका संपवून ते ६ एप्रिल रोजी भारतात दाखल झाले आहेत. त्यामुळे क्वारंटाइनच्या नियमांचे ते पालन करत आहेत. रबाडा आणि नॉर्जेची कमतरता दिल्लीला पहिल्या सामन्यात मारक ठरू शकते. चेन्नई सुपरकिंग्जचा लुंगी निगिडीच्या बाबतीतही तिच समस्या आहे. तोही क्वारंटाइन असल्यानं पहिल्या सामन्यात खेळू शकणार नाही. दिल्लीसमोर आणखी एक अडचण म्हणजे फिरकीपटू अक्षर पटेल कोविड पॉझिटिव्ह आढळल्यानं तोही सामन्याला मुकणार आहे.

चेन्नई दमदार सुरुवात करण्यासाठी सज्ज

आयपीएलच्या आजवरच्या सर्व सीझनमध्ये प्ले-ऑफपर्यंत मजल मारलेल्या चेन्नई सुपरकिंग्ज संघाला गेल्या मोसमात गुणतालिकेत सातव्या स्थानी समाधान मानाव लागल होतं. गेल्या मोसमातली निराशाजनक कामगिरी पुसून टाकण्यासाठी धोनी ब्रिगेड सज्ज झाली आहे. त्यात 'मिस्टर आयपीएल' सुरेश रैना पुन्हा एकदा मैदानात दिसणार असल्यानं त्याच्या कामगिरीकडेही सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे.

आकडेवारीत चेन्नईच अव्वल

चेन्नई विरुद्ध दिल्लीची आतापर्यंतची आकडेवारी पाहता चेन्नई सुपरकिंग्ज सरस ठरली आहे. आतापर्यंत चेन्नईनं दिल्लीविरुद्ध १५ लढती जिंकल्या आहेत. तर दिल्लीनं चेन्नईला ८ वेळा नमवले आहे.

सामना - चैन्नई सुपर किंग्ज विरुद्ध दिल्ली कॅपीटल्स 

ठिकाण - वानखेडे स्टेडियम, मुंबई 

वेळ - सायंकाळी ७ वाजून ३० मिनिटांनी

थेट प्रक्षेपण - स्टार स्पोर्ट्स नेटवर्क, हॉटस्टार

संभाव्य संघ - 

चैन्नई सुपर किंग्ज - मोईन अली, फाफ डु प्लेसिस, सुरेश रैना, अंबाती रायुडु, महेंद्रसिगं धोनी (कर्णधार, यष्टिरक्षक), रवींद्र जडेजा, सॅम कुरन्न, ड्वेन ब्राव्हो, के. गौतम, शार्दुल ठाकुर, दिपक चहर

दिल्ली कॅपीटल्स - पृथ्वी शॉ, शिखर धवन, स्टीव्ह स्मीथ, रिषभ पंत (कर्णधार, यष्टिरक्षक), मार्कस स्टोईनीस, शिमरन हेटमायर, क्रीस व्होक्स, आर. आश्विन, उमेश यादव, अमित मिश्रा, इशांत शर्मा

आमच्या बातम्या WhatsApp वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा