आमदार राठोड यांच्या निधीतून रुग्णवाहिकेचे लोकार्पण

आमदार राठोड यांच्या निधीतून रुग्णवाहिकेचे लोकार्पण

मंठा/ प्रतिनिधी - मंठा तालुक्यातील रुग्णांच्या सेवेसाठी विधानपरिषदेचे आमदार राजेश राठोड यांच्या स्थानिक विकास निधीतून अद्यावत रुग्णवाहिकेचा लोकार्पण सोहळा शुक्रवारी पार पडला. या अद्ययावत रुग्णवाहिकेचा लोकार्पण सोहळा आमदार राजेश राठोड यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून करण्यात आला.

यावेळी बोलताना आमदार राठोड म्हणाले की, कोरोनासारख्या महामारीमुळे संपूर्ण जग चिंतीत असून जास्तीत जास्त आरोग्यविषयक सुविधा प्राधान्याने उपलब्ध करून देण्याचा काळ आहे, व या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. अशा कठीण काळात आमदार निधीतून पहिले काम म्हणून तालुक्यातील रुग्णांसाठी अद्यावत व सुसज्ज रुग्णवाहिका उपलब्ध करून दिल्याचे समाधान वाटत आहे. तसेच मुख्यमंत्री आणि आरोग्य मंत्री यांना आपण लवकरच भेटणार असून, मंठा येथील ट्रामा केअर सेंटरसाठी आणखी निधी उपलब्ध करून रिक्त जागा भरण्यासाठी देखील पाठपुरावा करणार असल्याचे आ. राठोड यांनी सांगितले.

जालना जिल्ह्यासाठी पाच रुग्णवाहिका उपलब्ध झाल्या असून त्याची सुरुवात आ. राठोड यांनी केल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. भोसले यांनी सांगितले. लवकरच मंठा येथे कोविड रुग्णांसाठी सर्व सुविधांनी युक्त 35 ते 40 खाटांचे रुग्णालय देखील होत असल्याचे त्यांनी सांगितले. मंठा तालुक्यासाठी रुग्णवाहिका उपलब्ध करून दिल्याबद्दल गावकरी, पत्रकार संघ, मंठा तालुका डॉक्टर्स असोसिएशन आणि युवक काँग्रेसच्या वतीने आ.राजेश राठोड यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक वैद्यकीय अधीक्षक डॉ.राजेंद्र गायके यांनी केले तर आभार प्रदर्शन डॉ. प्रताप चाटसे यांनी केले. 

ग्रामीण रुग्णालयात पार पडलेल्या रुग्णवाहिकेच्या लोकार्पण सोहळ्यासाठी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.अर्चना भोसले, पोलिस निरीक्षक विलास निकम, उपनगराध्यक्ष सिराजखा पठाण, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष निळकंठ वायाळ, जिल्हा उपाध्यक्ष किसनराव मोरे, शरद बोराडे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. राजेंद्र गायके, डॉ.घोडके, सचिन राठोड, डॉ.बालासाहेब काळे आदी उपस्थित होते.

आमच्या बातम्या WhatsApp वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा