संभाजीनगरच्या सहदुय्यम निबंधकाला लाच स्वीकारताना पकडले

संभाजीनगरच्या सहदुय्यम निबंधकाला लाच स्वीकारताना पकडले

छत्रपती संभाजीनगर /प्रतिनिधी -  भावजयीच्या नावावर असलेली शेतजमीन पत्नीच्या नावे करण्यासाठी पाच हजार रुपयांची लाच तक्रादाराकडून स्वीकारताना येथील सहदुय्यम निबंधक (वर्ग-२) छगन उत्तमराव पाटील (वय ४९ वर्षे) यांच्यासह दोघांना छत्रपती संभाजीनगर येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले.
   ही कारवाई शहरातील सहदुय्यम निबंधक कार्यालयात शुक्रवार, १ मार्च रोजी करण्यात आली. पाटील यांच्यासह स्टॅम्प वेंडर भीमराव किसन खरात (वय ५८ वर्षे) अशी लाच घेणाऱ्या आरोपींची नावे आहेत. दरम्यान, या कारवाईनंतर एसीबीने पाटीलच्या घराची झडती घेतली असता तब्बल १ कोटी ३५ लाख रुपये आढळून आल्याने खळबळ उडाली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, सिल्लोड तालुक्यातील आमठाणा येथील ३९ वर्षीय तक्रारदार व त्यांची भावजयी यांच्या नावे याच तालुक्यातील धावडा शिवारातील गट क्रमांक ४७/१ मध्ये सामाईक शेती आहे. ही शेती तक्रारदाराच्या पत्नीच्या नावावर करण्यासाठी तक्रारदाराने खरात याची भेट घेतली. त्यानंतर खरात याने याबाबतची माहिती पाटील यांना सांगितली. मात्र या कामासाठी पाच हजार रुपयांची मागणी तक्रारदाराला या दोघांनी केली. पाच हजार रुपये देण्याची तक्रारदाराची इच्छा नव्हती. त्यामुळे तक्रारदाराने याप्रकरणी छत्रपती संभाजीनगर येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार नोंदविली. त्यानंतर या विभागाच्या पथकाने शहरातील सहदुय्यम निबंधक कार्यालयात शुक्रवार, १ मार्च रोजी सापळा रचला. त्यानंतर तक्रारदाराकडून पाच हजारांची लाच स्वीकारताना पाटील आणि खरात यांना या पथकाच्या अधिकाऱ्यांनी रंगेहाथ पकडले. 
ही कारवाई या विभागाचे पोलिस अधीक्षक संदीप आटोळे, अपर पोलिस अधीक्षक मुकुंद आघाव, पोलिस उपाधीक्षक राजीव तळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक सचिन साळुंखे, पोलिस हवालदार साईनाथ तोडकर, केवलसिंग गुसिंगे, युवराज हिवाळे, पोलिस अंमलदार बागुल यांनी केली. याप्रकरणी सिल्लोड शहर पोलिस ठाण्यात आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

एकाच दिवशी निलंबन आणि लाचप्रकरणी अटक
सदर आरोपी पाटीलने सप्टेंबर २०२२ ते सप्टेंबर २०२३ या दरम्यान एकूण ४४ तुकडा बंदी संदर्भाने नोंदणी केली होती. सदर प्रकरणात मुद्रांक मूल्यांकन कमी करून शासनाची तब्बल ४८ लाखांचे नुकसान केले शिवाय ८६ दस्तांमध्ये नियमांचा भंग केला. हा घोटाळा समोर आल्यानंतर राज्याच्या उपसचिवांकडून त्यांच्या चौकशीचे आदेश जारी झाले. त्यात पाटील दोषी निष्पन्न झाल्याने त्यांना २९ फेब्रुवारी रोजी निलंबित करण्यात आले.

निलंबन कारवाईची नव्हती कल्पना
पाटील याला आपण निलंबित झाल्याची शुक्रवारी दुपारपर्यंत कल्पना नव्हती. नेहमीप्रमाणे दालनात काम करत असताना त्याने तक्रारदाराला पाच हजार रूपये घेऊन येण्यास सांगितले. तक्रारदार कायार्लयात पोहोचले. तोपर्यंत पाटील यांना निलंबनाची वार्ता कळाली होती. मात्र, तरी त्यांनी स्टॅम्पव्हेंडरच्या मदतीने लाच स्वीकारली. जवळच दबा धरून बसलेल्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने दोन्हीही लाचखाेरांना ताब्यात घेतले.

आमच्या बातम्या WhatsApp वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा