२८ लाखाच्या रोकडसह एसबीआय बॅंकेचे एटीएम चोरट्यांनी पळविले

जालन्याच्या औद्योगिक वसाहतीतील घटना

२८ लाखाच्या रोकडसह एसबीआय बॅंकेचे एटीएम चोरट्यांनी पळविले

जालना / प्रतिनिधी - जालना शहरातील अतिरिक्त औद्योगिक वसाहतीमध्ये असलेल्या भारतीय स्टेट बँकेच्या नागेवाडी शाखेमध्ये असलेले एटीएम मशीन लंपास केल्याची खळबळजनक घटना मध्यरात्री २ वाजेच्या सुमारास घडली. या घटनेमुळे एटीएमच्या सुरक्षेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. 

सविस्तर वृत्त असे की, नागेवाडी परिसरात असलेल्या एसबीआय बॅंकेलगत याच बॅंकेचे डायबोल्ड कंपनीचे एटीएम मशीन आहे. चोरट्यांनी मध्यरात्री दीड ते दोन वाजेच्या सुमारास चक्क हे एटीएम मशीनच पळविले आहे. त्याठिकाणी असलेल्या सीसीटीव्ही कॅमेरामध्ये चोरट्यांनी एटीएम मशीन एका पांढऱ्या स्कॉर्पिओ गाडीत टाकून नेताना दिसले आहेत. सलग दोन दिवस बॅंकांना सुट्टी असल्याने एटीएम मध्ये मोठी रक्कम ठेवण्यात आली होती. या एटीएम मध्ये असलेले २८ लाख ६७ हजार ६०० रुपयांसह ४ लाखांचे एटीएम मशीन असा एकुण ३२ लाख ६७ हजार ६०० रूपयांचा ऐवज चोरट्यांनी पळविला आहे. या संबंधी बॅंकेचे शाखा अधिकारी संतोष अय्यर यांनी तक्रार दिली असुन, चंदनझीरा पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

दरम्यान या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून, एटीएमच्या सुरक्षेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. 

आमच्या बातम्या WhatsApp वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा